लोणावळा : येथील हॉटेल विसप्रिंग वुड याठिकाणी साऊंड सिस्टीमच्या मोठया आवाजात अश्लील गाण्यावर विवस्त्र चाळे करुन अश्लील नृत्य करणाऱ्यांवर लोणावळा पोलिसांनी धडक कारवाई केली. लोणावळा उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये एकूण 53 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यात 44 पुरुष व 9 महिलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हॉटेल विसप्रिंग वुड याठिकाणी काही इसम व महिला असे अश्लील गाण्यावर अश्लील नृत्य करुन साऊंड सिस्टीम मोठया आवाजात वाजवून विवस्त्र चाळे करुन गाण्याचे तालावर नाचत आहेत. या महितीच्या आधारे आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी स्वतः त्यांचे पथक व लोणावळा शहर पोलीस स्टेशनचा पोलीस स्टाफ यांच्यासह विसप्रिंग वुड हॉटेल मध्ये अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी एकुण 44 पुरुष व 9 महिला असे एकूण 53 जण अश्लील गाण्यावर अश्लील नृत्य करुन विवस्त्र चाळे करुन नियम व तरतुदीचे उल्लघंन करीत असताना मिळून आले.
पोलिसांनी सदर सर्व पुरुष व महिलांना ताब्यात घेवून साऊंड सिस्टीम पंचासमक्ष जप्त केली असून पो.कॉ. संदिप अजिनाथ बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लोणावळा शहर पोलीस ठाण्यात महा. पोलीस अधिनियम कलम ३३ (एन) १३१ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.




