पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा सुरु आहे. चिंचवड विधानसभा कोणत्याही परिस्थितीत घड्याळ चिन्हावरच लढविणार असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज शहरातील पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच घराघरात घड्याळ चिन्हे पोहोचवा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे स्पष्ट निर्देश आज पुणे येथील बारामती होस्टेल वरती झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजितदादांनी दिले आहेत.
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांना अजित पवार यांनी आज (गुरुवारी) पुण्यातील बारामती होस्टेल येथे बोलावून बैठक घेतली. प्रमुख इच्छुक असलेले भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयुर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, माया बारणे, राजेंद्र जगताप, ॲड. गोरक्ष लोखंडे, राजू लोखंडे, माधव पाटील यांच्याशी अजितदादांनी वैयक्तिकरित्या चर्चा केली. त्यानंतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी एकत्रित पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह मतदारसंघात घरोघरी पोहोचवा कोणत्याही परिस्थितीत चिंचवड विधानसभा ही घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल. याबाबत सर्वांशी चर्चा करून सोमवारी अंतिम निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, चिंचवडचे निरीक्षक आणि मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, मंगला कदम, माजी सभागृह नेते जगदीश शेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी निरीक्षक सुनील शेळके यांना निवडणूक काळात राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभेचे नियोजन करण्याचे अजितदादा यांनी सांगितले. चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये राज्यातील नेते मतदारसंघात ठिकठिकाणी सभेसाठी निमंत्रित करण्याची जबाबदारी शेळके यांच्यावरती देण्यात आली आहे. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल त्यामुळे मतदारसंघात घरोघरी घड्याळ चिन्ह पोहोचवा आणि निवडणुकीच्या कामाला लागा अशा स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी यावेळी दिल्या आहेत.




