संगमनेर : राज्यात सर्वाधिक चर्चा झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर असून त्यामध्ये सत्यजीत तांबे विजयी झाले आणि महाविकास आघाडीने समर्थन दिलेल्या शुभांगी पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
पण या निकालाच्या निमित्ताने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सत्यजीत तांबे यांनी त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने काँग्रेसला ‘मामा’ बनवलं की काँग्रेस नेत्यांनी ईडीच्या भीतीने नांगी टाकली? बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असूनही, महाविकास आघाडीचे सर्व पाठबळ असूनही शुभांगी पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांच्याबद्दल संकेत दिले होते. सत्यजीत तांबेंमध्ये क्षमता असून त्यांना जास्त वेळ दूर ठेऊ नका, अशा लोकांवर आमची नजर असते असं त्यांनी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेत्यांना उद्देशून वक्तव्य केलं होतं. त्यावेळेपासूनच सत्यजीत तांबे यांच्यावर भाजपची नजर असल्याचं स्पष्ट झालं.
नंतरच्या काळात ज्यावेळी विधानपरिषदेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली त्यावेळी भाजपचे काही वरिष्ठ नेते सत्यजीत तांबे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंबंधी बाळासाहेब थोरातांना इशाराही दिला होता. पण काँग्रेस नेत्यांच्या नेहमीच्या वेळकाढू भूमिकेमुळे हा गुंता सुटला नाही आणि सत्यजीत तांबे यांची उमेदवारी ताटकळत ठेवण्यात आली.
नाशिक पदवीधरसाठी सत्यजीत तांबे यांनी सुरुवातीपासून तयारी सुरू केली असताना पक्षाचा एबी फॉर्म मात्र त्यांच्या वडिलांना म्हणजे सुधीर तांबे यांना देण्यात आला. मुळात सुधीर तांबे यांनी सत्यजीत तांबे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केला होता, पण काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या हट्टापायी सत्यजीत यांना उमेदवारी मिळाली नसल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांचे मामा. त्यांना आपल्या मुलीला, जयश्री थोरातांना राजकारणात पुढे आणायचं, म्हणून त्यांनी सत्यजीतला सातत्याने उमेदवारी नाकारली अशी चर्चा नगरमध्ये नेहमीच असते. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या वेळीही त्याचा प्रत्यय आला. या यात्रेचं सगळं नियोजन सत्यजीत तांबे यांच्याकडे असताना बाळासाहेब थोरातांनी मात्र त्यांच्या मुलीवर म्हणजे जयश्री थोरात यांच्यावर फोकस कसा राहिल याची काळजी घेतली. पण सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी काम करताना अनेकांशी चांगले संबंध ठेवले आणि वाढवलेही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवेळीही त्यांनी केलेल्या नियोजनाचं अनेकांनी कौतुक केल्याची चर्चा आहे.
यंदा नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसमधून सत्यजीत तांबे यांची उमेदवारी पक्की समजली जात होती. पण घोंगडं भिजवत ठेवण्याच्या काँग्रेसच्या नेहमीच्या भूमिकेमुळे मोठा संभ्रम झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की सत्यजीत तांबे यांना पक्षाने एबी फॉर्म दिला होता. तर दुसरीकडे आपल्याला शेवटपर्यंत पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही असं वक्तव्य खुद्द सत्यजीत तांबे यांनी केलंय.
सत्यजीत तांबे यांना असणारा भाजपचा छुपा पाठिंबा ही गोष्ट काही लपून राहिली नाही. सत्यजीत तांबे यांच्यासाठी भाजपने शुभांगी पाटील यांना पक्षाची उमेदवारी दिली नाही. पण पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसने सत्यजीत तांबे आणि सुधीर तांबे यांची हकालपट्टी करुन त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. पण भाजपचं मात्र आधीच ठरलं होतं, त्यांनी सत्यजीत तांबे यांच्यामागे सगळी ताकत लावली.
एकीकडे सत्यजीत तांबे यांच्यामागे उभे राहा असा वरुन संदेश आला असताना भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांचे मात्र तळ्यात मळ्यात सुरू होतं. सत्यजीत तांबे यांना पक्षात घ्यावं तर उद्या ते सुजय विखेंसाठी आव्हान ठरु शकतात, आणि न घ्यावं तर त्याशिवाय जिल्ह्यातील काँग्रेस खिळखिळी कशी होणार, त्यांचं महत्व कसं वाढणार? या द्विधा मनस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील असल्याचं दिसून आलं.
सुरुवातीला नगरची काँग्रेस ही सत्यजीत तांबे यांच्याविरोधात काम करत असल्याचं दिसत होतं. पण दिवस जसजसे पुढे जातील तसतसे काँग्रेसचे कार्यकर्ते सत्यजीत तांबे यांच्या मागे असल्याचं दिसून आलं. महत्त्वाचं म्हणजे सत्यजीत तांबे यांच्यासाठी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची संपूर्ण टीम काम करत असल्याची चर्चा होती. केवळ बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कन्या जयश्री थोरात यापासून दूर होत्या. दूर म्हणजे या निवडणुकीपासूनही असल्याचं दिसून आलं. धनंजय मुंडेना रुग्णालयात भेटायला जाणारे बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी एक दिवसही कॅमेरासमोर आले नाहीत हे विशेष.
विशेष म्हणजे बाळासाहेब थोरातांच्या MH-17-567 या गाडीतूनच सत्यजीत तांबे यांनी प्रचार केला. ही गाडी अहमदनगर आणि इतरही जिल्ह्यात बाबासाहेब थोरातांची गाडी म्हणूनच ओळखली जाते. त्यामुळे बाळासाहेब थोरात जरी प्रत्यक्ष या निवडणूकीत सहभागी झाले नाहीत तरी त्यांच्या गाडीतून प्रचार करुन सत्यजीत तांबेंनी मतदार आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांना जो द्यायचा तो संदेश दिला. एका अर्थाने सत्यजीत तांबेंसाठी बाळासाहेब थोरातांची कमतरता या गाडीने भरून काढली.
महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील या बाळासाहेब थोरात यांच्या घरी गेल्या असता त्यांना ते मुंबईत असल्याचं समजलं. या दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्यावर खांद्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते मुंबईत असल्याने शुभांगी पाटील यांना त्यांची भेट घेता आली नाही. इतकंच काय की बाळासाहेब थोरातांच्या वॉचमनने त्यांच्या बंगल्याचे गेटही उघडलं नाही. यासंबधित एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश जायचा तो गेला आणि सगळी टीम सत्यजीत तांबे यांच्या पाठिशी राहिल्याची चर्चा आहे.
राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी या आधीही त्यांना सोईची भूमिका घेतल्याचं दिसून आलंय. कोल्हापूरच्या सतेज पाटलांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही काँग्रेस नेत्याने निवडणुकीत भाजपला अंगावर घेतल्याचं दिसत नाही. त्याचा फटका काँग्रेसला बसतोयच, पण महाविकास आघाडीलाही बसल्याचं सांगितलं जातंय. ज्या नेत्यांना काँग्रेसने इतकी वर्षे अनेक पदं दिली, त्यांनीच सोईची भूमिका घेत पक्षाची गोची केली तर कार्यकर्त्यांनी काय करायचं?
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासून काही काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना घाबरुन भाजपविरोधात रोखठोक भूमिका घेतली नसल्याचं दिसतंय. गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत याची प्रचीती आली. आताही नाशिक पदवीधरच्या निमित्ताने तेच दिसून येतंय.
वास्तविक पाहता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची नगरमध्ये मोठी ताकद आहे. त्यांनी जर ठरवलं असतं तर पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा विजयही शक्य होता. पण त्यांचे सगळेच कार्यकर्ते, अगदी जवळचे असलेले कार्यकर्ते भाजपने छुपा पाठिंबा दिलेल्या सत्यजीत तांबे यांच्या प्रचारात उतरल्याचं दिसलं. मग बाळासाहेब थोरात यांना आपल्या भाच्याच्या विजयात अडथळा आणायचा नव्हता की त्यांनी इतर काँग्रेस नेत्यांप्रमाणे, ईडीचा ससेमिरा नको म्हणून फडणवीसांच्यासमोर नांगी टाकली? फडणवीसांनी मुंबईतून टाकलेल्या जाळ्यामध्ये नगरमध्ये प्राबल्य असलेले बाळासाहेब थोरात फसले की मामा-भाच्याने मिळून काँग्रेसलाच ‘मामा’ बनवलं? यासारख्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं येत्या काळात नगरच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला समजतील अशी आशा आहे.



