चिंचवड : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी देत प्रचारही सुरू केला आहे.. असं असतांना शिवसेना ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत राहुल कलाटे यांची माघार व्हावी यासाठी स्वतः अजित पवार प्रयत्न करीत आहे.
राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यास महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सरळ सामना होणार आहे. उद्धव ठाकरे यांना राहुल कलाटे यांची उमेदवारी माघे घेण्यासाठी विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे यानी सचिन अहिर यांना राहुल कलाटे यांची भेट घेण्यास सांगितली आहे.
सचिन अहिर हे आज पुणे दौऱ्यावर असून ते राहुल कलाटे यांची भेट घेणार आहे. महाविकास आघाडी म्हणून यामध्ये माघार घेण्याचा आग्रह सचिन अहिर यांच्याकडून केला जाईल अशी शक्यता आहे. सचिन अहिर हे राहुल कलाटे आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणं करून देण्याची शक्यता असून उद्धव ठाकरे स्वतः कलाटे यांचा उमेदवारी अर्ज माघे घेण्यासाठी प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. दुसरीकडे राहुल कलाटे यांनीही निवडणुकीत माघार घेणार नाही अशीच भूमिका कायम ठेवली आहे. पण शिवसेनेच्या शिष्टाईला यश आले तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे एक पाऊल मागे टाकत निवडणूक अर्ज मागे घेतील अशी चर्चा आहे. तसे झाले तर कसबा विधानसभा निवडणुका प्रमाणे चिंचवड विधानसभेतही भाजपची थेट महाविकास आघाडीचा सामना होईल आणि निवडणुक चुरशीची होईल.




