मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला ३९ दिवसांपूर्वी परळीमध्ये अपघात झाला होता. या अपघातानंतर मुंडेंवर मुंबईत उपचार झाले. उपचार आणि मुंबईतील विश्रांतीनंतर आज धनंजय मुंडे परळीत दाखल झाले. परंतु त्यांच्या स्वागताला जो लवाजमा होता, तो पाहून सर्वच आवाक् झाले आहेत.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी तब्बल १०१ जेसीबी हजर होत्या. त्या जेसीबींमधून १० टन फुलांची वृष्टी करण्यात आली. हा सगळा डामडौल बघून सगळेच आश्चर्य व्यक्त करीत आहेत. अपघातानंतर ३९ दिवसांनी धनंजय मुंडे परळीमध्ये दाखल झाले.
सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन स्व. गोपीनाथराव मुंडे यांना वंदन केलं. त्यानंतर गोपीनाथगड ते परळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. डीजे, विद्युत रोषणाई अन् कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. विशेष म्हणजे संसदेची प्रतिकृती स्वागतासाठी लावण्यात आली होती.



