मुंबई : हिंडेनबर्ग अहवालाने अदानी समूहाची झोप उडवली आहे. अजून ते या धक्यातून सावरले नाहीत. आर्थिक विश्वात अदानी समुहाला धक्क्यावर धक्के बसले आहेत. हिंडनबर्ग रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या गुंतवणूक फर्मने २५ जानेवारी रोजी एक अहवाल जाहीर केला होता. ज्यामुळे भारतीय शेअर बाजारात चिंतेचे वातावरण पसरले. या अहवालात गौतम अदाणी यांच्या नेतृत्वाखालील अनेक कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले होते. तसेच हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी अदानी समुहाला आणखी एख धक्का बसला आहे.
हिंडेनबर्ग प्रकरणी अदानी समूहाची चौकशी होण्याची शक्यता आहे. मात्र न्यायालयातील सुनावणीनंतर हे स्पष्ट होईल. काँग्रेस नेत्या डॉ. जया ठाकूर यांच्या अदानी समूहाविरुद्ध चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर १७ फेब्रुवारीला सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले. समूहाने आपल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती चुकीच्या पद्धतीने वाढवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर हे प्रकरण तात्काळ यादीसाठी नमूद करण्यात आले होते. सीजेआय यांनी सुरुवातीला २४ फेब्रुवारीला यावर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.



