मोशी (वार्ताहर) – पन्नास लाखांपासून सुरू झालेली बोली पत्रास लाख, साठ लाख, ऐंशी लाख म्हणत म्हणत अखेर ८१ लाखांवर येऊन थांबली. तिसरा अंतिम पुकार झाला मानाचा विडा एक्याऐंशी लाखाला. बस्स मंदिरात टाळ्या पडल्या आणि मानाच्या विड्याची बोली लावून धरलेले भाविक अतिश आनंदा बारणे नागेश्वरा चरणी नतमस्तक झाले.
नागेश्वर महाराज यात्रा व भंडारा उत्सवानिमित्त मोशीचे जागृत देवस्थान नागेश्वर महाराजांपाशी भक्तांची अतूट श्रद्धा व्यक्त करणारी यात्रेतील लिलाव प्रथा यंदाही पार पडली. महाराजांच्या उत्सवास शिवरात्रीपासून सुरुवात झाली असून, सोमवारी (दि. 20) रोजी परंपरागत लिलाव नागेश्वर महाराज मंदिर सभागृहात पार पडला. उत्सवात वापरल्या गेलेल्या व महाराजांच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव जवळजवळ एक कोटींच्या वर गेला आहे.
मानाची ओटी भालचंद्र दत्तोबा बोराटे यांनी बोली लावून तब्बल 33 लाख 55 हजार 555 रुपयाला मिळवली. तर, लिलावात शेवटचे लिंबू फळ बोली लावून तब्बल 17 लाख रुपयाला नीरज नंदकुमार जाधव यांनी घेतले. या लिलावात बोली लावण्याचा मान केदारी कुटुंबाला देण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने नारायण केदारी, सागर केदारी, निखिल केदारी यांनी लिलावाचे काम पाहिले.




