पिंपरी : चिंचवड व कसबा निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपला कडवी झुंज दिली. यात कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना धूळ चारत विजय मिळवला तर चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप या आघाडी कायम ठेवत आहेत. मात्र दुसरीकडे नाना काटे यांच्या मतदानात कलाटे यांनी काटे पसरल्याचे दिसून येत आहे.
अश्विनी जगताप यांना २१ व्या फेरी अखेर ७७,४९३ मते घेत आघाडी कायम ठेवली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ६५,७७५ मध्ये मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना केवळ २४,१९३ मते मिळवत समाधान व्यक्त करावे लागत आहे.
यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मिळालेले मतदान भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. अपक्ष राहुल कलाटे यांना मिळणाऱ्या मतामुळे महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्या मतांच्या आकडेवारी मागे पडताना दिसून येते. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या मताची आकडेवारी पाहता त्यांच्या विरोधात असणाऱ्या मतांची बेरीज अधिक आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकीत जगताप यांना विचार करावयास लावणारी मतदान असल्याचे दिसून येते.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे आधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं ते निकालातून स्पष्ट होताना दिसत आहे. ऐनवेळी राहुल कलाटे यांनी मविआ विरोधात बंडखोरी केल्याने भाजपला अधिक प्रबळपणे डावपेच खेळता आले. कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मविआ उमेदवार नाना काटे यांच्या मतांचं विभाजन झाल्याचं दिसून येतंय. तसतसे एक एक फेऱ्या होत असताना जगताप आणि काटे यांना मिळणाऱ्या मतदानातून दिसत आहेत.




