पुणे : महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीवर सगळ्यांचे बारीक लक्ष आहे. या मतमोजणीत कसबा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवाराला धूळ चालत विजय संपादन केला. चिंचवड मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरू आहे. मात्र, भाजपच्या अश्विनी जगताप या 12,000 मतांची आघाडी कायम ठेवून आहेत.
दोन्ही मतदारसंघातील निवडणुका सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. कसबा निडणुकीत भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्यावरूनही भाजपमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला होता. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयानंतर बोलताना म्हटले की लोकांनी पैसे घेतले मत मात्र मनातील धंगेकारलाच दिले. त्याच्या वक्तव्याची चर्चा पुण्यात जोरदार सुरू झाले आहे.
पुढे बोलताना धंगेकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या विजयाची इथून सुरुवात झाली आहे. ती राज्यातही सत्ता घेणार आहे. भाजपला जनतेनं कात्रजचा घाट दाखवलाय. हा लोकशाहीचा विजय आहे. मी सर्वसमावेशक राजकारण केल्यामुळे त्याचं हे चित्र दिसतंय. कालच माझी पत्नी म्हणाली की, तुम्हाला आता सगळं अवघड आहे. तुमच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. तुम्हाला खूप काम करायचं आहे”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
धंगेकरांच्या या वक्तव्यावरुन निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारावर चर्चा सुरू झाली आहे. कसब्यातून मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणालातरी भाजपने उमेदवारी द्यावी, अशी भूमिका विरोधकांकडून घेतली गेली होती. टिळक कुटुंबीयांकडूनही तशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, भाजपने हेमंत रासनेंना उमेदवारी दिल्यामुळे हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता.




