पुणे – गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी -चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल सुरू आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागले होते. यामधील कसबा पेठ विधानसभेचा निकाल जाहीर झाला यामध्ये “हू इज धंगेकर” म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांना चपराक मिळत आमदार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत.
कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर मविआकडुन रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, आता कसब्यात रवींद्र धंगेकर हे किंगमेकर ठरल्याचं दिसून येत आहे.
भाजपचा २८ वर्षे बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निर्णायक आघाडी कायम ठेवली. अखेर 11 हजार 40 मतांनी मविआचे धंगेकर विजयी झाले आहेत.




