पिंपरी : चिंचवड व कसबा निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपला कडवी झुंज दिली. यात कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना धूळ चारत विजय मिळवला तर चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप यानी ९९३७ आघाडी कायम ठेवली आहे. नाना काटे आणि कलाटे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपळे सौदागर, वाकड परिसरातील मतदान मोजणी पूर्ण झाली आहे. यात जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.
अश्विनी जगताप यांना २४ व्या फेरी अखेर ८४,४८९ मते घेत आघाडी कायम ठेवली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ७४,५५२ मध्ये मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना केवळ २८,७६६ मते मिळवत समाधान व्यक्त करावे लागत आहे.
यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मिळालेले मतदान भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. अपक्ष राहुल कलाटे यांना मिळणाऱ्या मतामुळे महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्या मतांच्या आकडेवारी मागे पडताना दिसून येते. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या मताची आकडेवारी पाहता त्यांच्या विरोधात असणाऱ्या मतांची बेरीज अधिक दिसून येत आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक असे सर्वच जोरदार कामाला लागले होते. सत्ताधारी गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले होते. शिवाय एकनाथ शिंदे गटाचे जवळपास सर्वच आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर मंत्रीही प्रचारासाठी रिंगणात होते. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे (ऑनलाईन), अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले, धनंजय मुंडे, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह सर्व नेते मैदानात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे सुद्धा शेवटच्याक्षणी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.




