पुणे, दि. 2 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विविध संवर्गातील एकूण 378 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. या पदासाठी पूर्व परीक्षा दि. 17 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आली होती.
उमेदवारांकडून एमपीएससी मुख्य परीक्षेच्या तारखांची प्रतिक्षा होती. अखेर आयोगाने गुरूवारी तांत्रिक सेवा मुख्य परीक्षेची अधिसूचना जाहीर केली. त्यात तारखा प्रसिद्ध केल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 16 एप्रिल 2023 रोजी अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे येथे होणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षा दि. 23 एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षा अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे येथे होणार आहेत. सविस्तर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.



