पिंपरी ३ मार्च : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यात गाजली. याठिकाणी महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पाठिंब्याच्या जोरावर निवडणूक लढवली. राहुल कलाटे यांच्यामुळे निवडणुकीमध्ये चूरस वाढलेले होती. तिरंगी वाटणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्यात प्रमुख लढत झाल्याचे दिसून आले. काटे व कलाटे यांच्या मतदानाची बेरीज पाहता राहुल कलाटे यांनी घेतलेल्या मतदानामुळे भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे दिसून आले.
निकालावरून चिंचवडमध्ये वंचितसा फारसा प्रभाव पडला नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. तर प्रकाश आंबेडकरांनी अजित पवारांचा यांनी राहुल कलाटे यांना उमेदवारी न देता नाना काटे यांना उमेदवारी दिल्याची टीका केली. राहुल कलाटेच चिंचवडला सक्षम पर्याय देऊ शकतात असा आशावाद निर्माण केल्याने राहुल कलाटे यांनी बंड पुकारले. आणि हाच वंचित फॅक्टर चिंचवड विधानसभेच्या निकालाला कलाटणी देणारा ठरला.
स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांची निधनामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप प्रमाणेच महाविकास आघाडी यांनी जोरदार प्रचार यंत्रणा लावल्याने निवडणूक मोठी चुरशीची झाली. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी यानी सभा, बैठका, रोडशो घेत निवडणुकीत सर्व राजकीय शक्ती पणाला लावलेली होती. मतदानादिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत मतदारसंघात ३० टक्के मतदान झाले होते. तर मतमोजणी दिवशी ८० टक्के मतदान पूर्ण होईपर्यंत भाजपच्या जगताप यांचे १० हजार मतांचे मताधिक्य होते. हे दोन्हीही घटनाक्रम विचार करणारे आहेत.
जगताप यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी या परिसरातील मतदान मोजणीला सुरुवात झाले तसे अश्विनीताई जगताप यांना २५ हजारांचे मताधिक्य या भागातून मिळाले. स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची सहानुभूतीमुळे अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ भरघोस मतदान मिळाले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटेंना ९९,४३५ तर राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मतदान मिळाले. यात काटे यांना जवळपास ३७ हजाराच्या फरकाने पराभव झाला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंमुळे या निवडणुकीला खरी कलाटणी दिली अशी चर्चा जास्त रंगली जात आहे. राहुल कलाटे यांनी या निवडणुकीत ४४ हजाराहून अधिक मत घेतली ती निर्णायक ठरली. विशेष म्हणजे राहुल कलाटेंना नात्यागोत्यातील राजकारण, शिवसेना, मनसे यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे आकडेवारी वरून दिसून येते. चिंचवड मतदारसंघात वंचितला मानणारा मोठा वर्ग आहे असा प्रकाश आंबेडकर भ्रमाचा भोपळा निकालावरून फुटला आहे.
राहुल कलाटेंना २०१९ च्या निवडणुकीत १ लाख १२ हजार मतदान मिळाले होते. मात्र पोटनिवडणुकीत त्यांना आपले डिपॉझिट वाचवता आले नाही. असे असले तरी राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फटका राष्ट्रवादीच्या नाना काटेंना बसल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही मान्य केले आहे. कलाटे यांच्या बंडखोरीमुळे तिरंगी लढत होईल असे वारंवार सांगितले जात होते. पण खरी लढत ही काटे आणि जगताप यांच्यात झाल्याचे दिसून आले. वंचित बहुजन आघाडी यांनी राहुल कलाटे यांना पाठिंबा देत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना विजयाचा मार्ग सुकर केला का असा प्रश्न नागरिकांना पडताना दिसत आहे.




