मुंबई : बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत. बुलढाण्यापाठोपाठ मुंबईच्या दादर येथील डॉ. अँटोनियो डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये गणिताचा पेपर फुटला. यानंतर मुंबईच्या क्राईम ब्रँचने या पेपरफुटी प्रकरणाचा तपास केल्यानंतर खळबळजनक खुलासा झाला आहे. या पेपर फुटीचे मुळ कनेक्शन अहमदनगर मध्ये सापडले आहे. अहमदनगर कॉलेज ट्रस्टीच्या 23 वर्षाच्या मुलीनेच बारावीचा पेपर फोडल्याचे तपासात उघड झाले आहेत. पेपर फोडण्यामागे धक्कादायक कारण समोर आले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर डॉ. अँटोनियो डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये देखील गणिताचा पेपर फुटला होता. विद्यार्थी परीक्षाकेंद्रात जाण्यासाठी 23 मिनिटं उरले असतानाच सकाळी 10.17 मिनिटांनी एका विद्यार्थ्याला व्हॉट्सअॅपवर गणिताचा पेपर आला. विद्यार्थी परीक्षा केंद्रात परवानगी नसतानाही मोबाईल फोन घेऊन गेला. त्यांचा फोन तपासला असता त्यात गणिताचा पेपर आढळला होता.याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- मुंबई क्राईम ब्रँचची धडक कारवाई
बारावीचा गणिताचा पेपर फोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अहमदनगरमधून पाच जणांना अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट वनने नगरच्या रुई छत्तीसी गावात जाऊन अत्यंत गुप्तपणं ही कारवाई केली. पाच जणांना अटक करून पुढील कारवाईसाठी मुंबईला नेण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये अहमदनगरच्या मातोश्री भागुबाई भांबरे अॅग्रीकल्चर अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजचे प्रिन्सिपल भाऊसाहेब अमृते, कॉलेज टीचर किरण दिघे, सचिन महानोर, ड्रायव्हर वैभव तरटे आणि कॉलेज ट्रस्टीची मुलगी अर्चना भांबरे (वय 23 वर्षे) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी 3 मार्च रोजी बोर्डाच्या कार्यालयात पोहोचले. येथून पश्नपत्रिका कलेक्ट केल्यानंतर परीक्षा केंद्रावर पोहचण्याआधीच त्यांनी प्रश्नपत्रिकांचे पार्सल उघडले. आरोपी महिला शिक्षिका किरण दिघे हिने तिच्या मोबाईलवरून गणित बोर्डाच्या परीक्षेचे पेपर डाउनलोड केले. यानंतर ज्या विद्यार्थ्यांकडून बोर्डाच्या पेपरसाठी 10-10 हजार रुपये घेतले आहेत त्यांना हा पेपर पाठवण्यात आला. यासाठी एक whatsapp ग्रुप तयार करण्यात आला होता. यापैकीच एका विद्यार्थ्याने हा पेपर मुंबईतील त्याच्या नातेवाईकाला पाठवला. दादरच्या परीक्षा केंद्रात या विद्यार्थ्याला पोलिसांनी कॉपी करताना अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये परीक्षेच्या अर्धा तास आधीच बारावीच्या पेपरचा फोटो सापडला. यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.
- कॉलेजचा रिझल्ट 100 टक्के लागावा म्हणून पेपर फोडला
आपल्या मातोश्री भागुबाई भांबरे अॅग्रीकल्चर अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजचा रिझल्ट 100 टक्के लागावा. यानंतर प्रवेशाच्या माध्यमातून लाखोंची माया गोळा करता यावी, यासाठी त्यांनी हा पेपर फोडल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. बोर्डाच्या परीक्षेत मदत केली जाईल असे सांगत या कॉलेजने येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांकडून आधीच पैसे घेतले होते. बुडाण्यात पेपर फुटल्यानंतर साखरखेर्डा पोलिसांनी या प्रकरणी सात आरोपींना अटक केली असून यात दोन शिक्षकांचा समावेश आहे. त्यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



