मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडील वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. आज आणि उद्या दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू राहणार असून लवकरच अंतिम निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला होते त्यावर शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी यांनी यक्तिवाद केला. अपात्रतेची नोटीस फक्त १६ जणांविरोधातच होती, काही आमदार परत येण्याच्या हेतूनं १६ जणांना नोटीस पाठवली होती. त्यावेळी ३९ आमदारांमध्ये गट पाडायचे होते. मेरीटवर युक्तिवाद करण्याची कोर्टाची जेठमलानींना सुचना करण्यात आली. या गोष्टी मांडू नका. मेरीटवर युक्तिवाद करा. असं कोर्टाने सांगितलं. तसेच हरिश साळवे आणि तुमच्या युक्तिवादात विसंगती असल्याचंही कोर्टाने म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून महेश जेठमलानी युक्तिवाद करीत आहेत. याच दरम्यान केनियाच्या सरन्यायाधीश आणि त्यांच्या सुप्रीम कोर्टातले न्यायमूर्ती सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान उपस्थित आहेत. कोर्टात उपस्थित महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी थोडावेळ ऐकणार आहेत. केनियाचे सरन्यायाधीश, न्यायमूर्ती भारताच्या सदिच्छा भेटीवर आले आहेत.



