तळेगाव दाभाडे : शहराजवळील मिंडेवाडी गावच्या हद्दीत रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. दत्ता गंगाराम खरात (वय ३३)व लहू भरत बगाड (वय २२ दोघे रा. शिरदे ता. मावळ जि. पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमांची नावे आहेत. पोलिसांनी ट्रकचालक मुकुंद कुमार शर्मा (वय ४० रा. कलकत्ता पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.१५) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मिंडेवाडी गावच्या हद्दीत रस्त्यावर धोकादायकपणे उभा केलेला ट्रक (क्र. एम एच १४ के क्यू १२३१) ला मागून भरधाव येणाऱ्या दुचाकी (क्र. एम एच १४ के एल ९२३०)ची धडक बसल्याने दत्ता व लहू हे गंभीर जखमी झाले.
सोमाटणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. उन्मेश गुट्टे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण करत आहेत.




