पुणे, दि. 15 मार्च – बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या एका महिलेने दहावीच्या गणित भाग एक पेपरचे फोटो स्वत:च्या मोबाइलमध्ये काढल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षक मनिषा संतोष कांबळे हिच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.
याप्रकरणी किसन दत्तोबा भुजबळ (वय 54 रा.चंदननगर,पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 15 मार्चला घडला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिबवेवाडीतील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय याठिकाणी दहावी परीक्षा केंद्र आहे. तेथे मोबाइल वापरण्यास बंदी असताना गणित भाग एक या विषयाचा इंग्रजी माध्यमाचा एन-113 विषयकोड असलेला प्रश्नपत्रिकेचा पान क्रं -8 या पानाचा फोटो सुरक्षारक्षक मनिषा कांबळे हिने काढला.
त्यामुळे तिच्यासह पेपरच्या दिवशीचे संबंधित ब्लॉकचे सुपरवायजर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंध कायदा 1982 (महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर निर्विष्ठ परीक्षा कायदा 1982)चे कलम 7, 8, नुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक रसाळ करत आहे.




