लोणावळा : अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने लोणावळेकरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसात भिजण्यापासून वाचण्यासाठी भंबेरी उडालेल्या नागरिकांनी मिळेल त्या छापराचा आसरा घेतला.
लोणावळा शहर आणि परिसरात काल गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अचानक ढग भरून आले आणि जोरदार वाऱ्यासोबत पाऊस कोसळू लागला. सुमारे अर्धा तास सलग बरसणाऱ्या या पावसामुळे बाजारहाट किंवा अन्य कारणासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तसेच कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांंची फजिती झाली.
रस्त्यावर पथारी टाकून बसलेल्या पथारीवाल्यांना तसेच हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आपल्या पथाऱ्या, हातगाड्या जागेवर सोडून मिळेल त्या छापराच्या ओसरीला धाव घ्यावी लागली. शहरातील अनेक रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते.




