वाकड : वाकडच्या मुळा नदीतील जलपर्णी काढणाऱ्या श्रीनिवास कलाटे युवा मंचचे अध्यक्ष श्रीनिवास कलाटे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, मराठवाडा विकास मंचचे अध्यक्ष अरुण पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस उदय ववले आदी मान्यवर उपस्थित होते.
वाकड येथील मुळा नदीतील बंधाऱ्यालगत कचरा, गाळ, लाकडी ओंडके, प्लास्टिक, जलपर्णी साचल्याने पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे १४ मार्च रोजी श्रीनिवास कलाटे युवा मंचतर्फे पोकलेनच्या साहाय्याने नदी व बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे नदी प्रवाह पूर्ववत सुरू झाला आहे. वाकडच्या मुळानदीच्या बंधाऱ्यालगत अनेक महिन्यांपासून गाळ व राडारोडा साठत होता. त्यामुळे नदीचा प्रवाह अडला होता.
गावठाणातील नदी किनारच्या रहिवाशांना दुर्गंधी, डासांचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्रीनिवास कलाटे यांनी समस्येकडे लक्ष देत युवा मंचाच्या वतीने तब्बल नऊ तासांहून अधिक पोकलेनचा वापर करून हा गाळ उपसल्याने नदी प्रवाह सुरळीत झाला. त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.




