मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेलं भाषणही तसाच चर्चेचा विषय ठरलं आहे. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी मनसे आणि शिंदे गटाच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तशी कोणतीही घोषणा राज ठाकरेंनी केली नसून उलट एकनाथ शिंदेंनाच खोचक सल्ला दिला आहे. तसेच, शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असल्याबाबतही राज ठाकरेंनी टोला लगावला आहे.
- सगळे सरकारकडे बघतायत आणि सरकार…!
“कशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रानं पाहिलंय आणि कशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्र बघतोय. नवीन उद्योग दिसत नाहीयेत. बेरोजगारी आ वासून उभी आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी सरकारकडे बघतायत आणि सरकार कोर्टाकडे बघतंय. आमचं काय होणार? आमचा निर्णय कधी लागतोय? असं कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
- नाही लोकांनी तुमच्या तोंडात चिखल घातला तर बघा
“आत्ताची राजकीय परिस्थिती पाहाता सगळ्यांनी एकदा ठरवा आणि अत्ताच विधानसभा निवडणुका लावा. जो काय सोक्षमोक्ष व्हायचा तो एकदा होऊनच जाऊन दे. जो काही चिखल केलाय, तो नाही नागरिकांनी तुमच्या तोंडात घातला तर बघा. नवीन नवीन मुख्यमंत्री आहेत, समजू शकतो आपण. करा काम नीट”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधकांनाही इशारा दिला आहे.



