ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर जवळ वांगणीत रामनवमी निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन झालं. पवित्र रमजान महिन्यात आलेली रामनवमी हा दुग्धशर्करा योग्य असल्याचं सांगत मुस्लिम धर्मियांनीही भक्तिभावाने रामनवमीच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला.
वांगणी गावात 1826 सालापासून रामनवमी उत्सव साजरा होतोय. या उत्सवाचं यंदा तब्बल 197 वावं वर्ष आहे. वांगणी गावात हिंदू आणि मुस्लिम धर्मीय अनेक वर्षांपासून एकोप्याने राहतायत. रामनवमीच्या पालखी सोहळ्यातही मुस्लिम धर्मीय उत्साहाने सहभागी होतात. आजही वांगणी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
यानंतर मुस्लिम मोहल्ल्यासह संपूर्ण गावात ही पालखी फिरली. या पालखीत घोडे, रथ यासह वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वांगणी गावातील ही पालखी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतिक असल्याचं यावेळी गावातील हिंदू आणि मुस्लिम धर्मियांनी सांगितलं.



