मुंबई : वर्सोवा-विरार सागरी सेतूचा खर्च दुप्पट झाला आहे. हा खर्च मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मंजूरही केला आहे. परंतु, या दुप्पट खर्चासंबंधी सल्लागाराचा अहवाल तपासण्यासाठी ‘एमएमआरडीए’ आता पुन्हा नवा सल्लागार नेमणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तयार केलेला दुप्पट खर्चाचा अहवाल याद्वारे एमएमआरडीए तपासणार आहे.
वर्सोवा ते विरार हे अंतर लवकर पूर्ण करण्यासाठी सागरी सेतू उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रारंभी हा मार्ग ‘एमएसआरडीसी’ तयार करणार होते. त्यांनी या प्रकल्पासाठी ३२ हजार कोटी रुपये खर्च मंजूर केला होता. मात्र, पुढे हा प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडे सोपविण्याबाबत निर्णय झाला. त्यावेळी या प्रकल्पाची अंदाजित किंमत ४० हजार कोटी रुपये असल्याचे ‘एमएसआरडीसी’कडून सांगण्यात आले.त्याचदरम्यान ‘एमएसआरडीसी’ने संबंधित प्रकल्पाच्या व्यवहार्यता सल्ल्याबाबत ‘मेसर्स पेंटॅकल-सेमोसा’ या कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने प्रकल्पाची किंमत तब्बल ६३ हजार ४२६ कोटी रुपये निश्चित केली. या खर्चासह असलेला व्यवहार्यता अहवाल ‘एमएमआरडीए’ने २९ नोव्हेंबर २०२२ला मंजूर केला. त्यानंतर आता २४ मार्चला झालेल्या ‘एमएमआरडीए’च्या १५४ व्या बैठकीत या ६३ हजार ४२६ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली. मात्र, या मंजुरीसह मूळ व्यवहाराची सखोल तपासणीही होणार आहे.