मुंबई : मुंबईतील नरिमन पॉइंट येथे असलेली एअर इंडियाच्या प्रसिद्ध इमारतीचा अखेर सौदा निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या इमारतीच्या अधिग्रहणासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, करार अंतिम होत नव्हता, असे सांगितले जात आहे. पण आता राज्य सरकाने याला तत्त्वतः मंजुरी दिली होती. केंद्र सरकारने तेथील सगळी कार्यालये हलवून १०० टक्के इमारतीचा ताबा आमच्याकडे दिल्यासच हा करार प्रत्यक्षात उतरणार असल्याचे एका वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितले आहे.
इमारतीची मालकी असलेल्या एआय अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या १,६०० कोटी रुपयांच्या अंतिम ऑफरला तत्त्वतः मान्यता दिली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली होती आणि महाराष्ट्र सरकारला ती इमारत विकण्याच्या प्रयत्नात सहकार्य करण्याची विनंती केली होती.
याच संदर्भात एका वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितले की, एआय अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडच्या मालकीची ती इमारत असून, त्यांनी ती देण्यास तत्त्वत: सहमती दर्शविली आहे. इतर गोष्टींवर काम सुरू आहे. परंतु आमची ऑफर सशर्त आहे. त्या इमारतीत जीएसटी आणि आयटी विभागाची कार्यालये आहेत. ती इमारत रिकामी झाल्यानंतर तिचा १०० टक्के ताबा मिळाल्यावरच आम्ही करारात पुढे जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.



