नागपूर : समृद्धी महामार्गावरील अनेक अपघातांचे मुख्य कारण म्हणजे टायर फुटणे किंवा टायरशी संबंधित समस्या आहेत. टायर्स सुरक्षित प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे नागपूर ग्रामीण आरटीओने टायर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. वाहनाचे टायर्स योग्य स्थितीत नसल्यास समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’ची कठोर पावले उचलेली आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी अशा वाहनांचा प्रवेश रोखण्यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला.
समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे व उपाययोजनांसाठी नुकतेच परिवहन उपायुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर यांनी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. पाहणीनंतर आरटीओ अधिकारी आणि ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील वाहनांचा कसून तपासणीसोबतच दोषी वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.



