मुंबई : अयोध्येत राम मंदिर व्हावे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तमाम रामभक्त- हिंदूत्ववाद्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. रामाच्या आशीर्वादानेच आपल्याला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले. अयोध्या आणि राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा नव्हे तर सर्वासाठी श्रद्धेचा, अस्मितेचा, हिंदूत्वाचा विषय आहे. त्यामुळेच हिंदूत्वाला विरोध करणाऱ्यांची दुकाने आता बंद होत आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला अयोध्येतील पत्रकार परिषदेत रविवारी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अयोध्येत रामलल्ला आणि मंदिराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेटी दिल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी राम मंदिर, हनुमान गढीला भेट देत शरयू नदीवर महाआरती केली. अयोध्येत शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपणच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसदार असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा देण्याबाबत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
यापूर्वीही आपण आयोजनासाठी अयोध्येत आलो होतो. मात्र प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाल्यावर आणि शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह मिळाल्यावर प्रथमच अयोध्येत आलो आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. लखनौपासून अयोध्यापर्यंत झालेल्या अपूर्व स्वागताने मी भारावून गेलो आहे. आजचा दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा असून येथून ऊर्जा घेऊन राज्य सुजलाम् सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.



