तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यामध्ये आर्थिक वर्षांमध्ये मोठी उलाढाल झाली असून तालुक्यातील औद्योगिक वसाहती, तळेगाव दाभाडे, वडगाव लोणावळा परिसरात असणारी शैक्षणिक संकुले, सह्याद्रीच्या डोंगरातील नयनरम्य निसर्ग सौंदर्य व येथील मुबलक पाणीसाठा व आरोग्यदायी वातावरण ही सर्वांनाच भुरळ घालतात.
मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकरण होत आहे. याचाच फायदा येथे होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात होत असून तळेगाव दाभाडे येथे असणाऱ्या दुय्यम निबंधक वडगाव – २ या कार्यालयामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये शासनाला तब्बल १४६ कोटी २९ लाख ३८ हजार १९९ रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत जमा झाला आहे.
तळेगाव शहर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उंच उंच इमारती उभ्या राहत असून यामधील असणारे फ्लॅट खरेदी विक्रीसाठी तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक वडगाव – २ हे उत्तम पर्याय आहे. या कार्यालयामध्ये नागरिकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध असून बैठक व्यवस्था देखील आहे. दुय्यन निबंध कार्यालयामध्ये असणारे सर्व कर्मचारी सहकार्याची भावना ठेवणारे असून याचे फलित म्हणून यावर्षी कार्यालयामध्ये १४ हजार ७६७ दस्त नोंदणी झाली आहे.
कार्यालयात झालेल्या फ्लॅट शेती एन ए प्लॉट आदी दस्तांच्या नोंदणी पोटी सरकारच्या तिजोरीमध्ये १३३ कोटी ९६ लाख ९६ हजार ५५१ रुपये स्टॅम्प ड्युटी व २ कोटी ३२ लाख ४१ हजार ५३८ रुपये रजिस्ट्रेशन असा एकूण १४६ कोटी २९ लाख ३८ हजार ११९ रुपये महसुल जमा झाला आहे. या आर्थिक वर्षातील सर्वांत कमी १०१४ दस्त नोंदणी ऑक्टोबर महिन्यात झाली आहे. तर, सर्वांत जास्त १५११ दस्ताची नोंदणी डिसेंबर महिन्यात झाली आहे.
कार्यालयामध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच जास्त नोंदणी होते यासाठी ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने टोकन दिले जाते कार्यालयामध्ये नागरिकांना बसण्याची पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची उपलब्धता आहे. – कपिल मोरे, प्रभारी दुय्यम निबंधक




