मुंबई : आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही, असं वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटाने अखेर शिवसेना भवनावर दावा केला आहे. शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
काही महिन्यांपूर्वी ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला देण्याचा निर्णय आयोगाने दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवन यावर आम्ही दावा करणार नसल्याचे म्हटले होते त्यानंतरही शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना भवन सर्व शाखा व निधी यावरती दावा ठोकला आहे.
त्यामळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका वकिल आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसंच, मी कोणत्याही गटाचा कार्यकर्ता नसल्याचं गिरी यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
“सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना अध्यक्ष म्हणून कायम ठेवले, तर शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या. तसंच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालावेत. याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या निकालासंदर्भात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता माझी देखील याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात यावी,” अशी मागणीही गिरी यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नसून, याचिकेचा शिंदे गटाशी संबंध नाही. एक वकील आणि मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. मी कायद्याच्या बाजूने आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला, तर सर्व त्यांना देण्यात यावे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला, तर त्यांना दिले जावे. मात्र, आता सर्व गोष्टींवर निर्बंध लागण्यात यावे,” असे गिरी म्हणाले. यामुळे आता सेना भवन अन् पक्ष निधी शिंदे गटाकडे जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



