पिंपरी, दि. १९ एप्रिल :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील चौथ्या मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागाजवळील कक्षाला दुपारी ३ च्या सुमारास अचानक आग लागली. सायरनचा आवाज सुरु झाला. धुराचे लोट, परिस्थितीचे गांभीर्य पाहून आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या अधिका-यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ समन्वय साधून सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. सूचना मिळताच सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या मजल्यासह इमारतीत उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना तात्काळ इमारतीबाहेरील सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले. या इमारतीत लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हा सर्व प्रकार घडला तो मॉकड्रीलच्या निमित्ताने. ’’राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे” औचित्य साधून सरकारी कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संकटकालीन बचाव प्रशिक्षण (फायर मॉकड्रिल) चे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयीन इमारतीत आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांमधील आपत्कालीन समन्वय आणि बचाव करण्याकामी करण्याची कार्यवाही याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने आज मॉकड्रील घेण्यात आले. अग्निशमन दल, पोलीस, सुरक्षा दल तसेच इमारतीतील अधिकारी कर्मचारी आणि नागरिक या मॉकड्रीलमध्ये सहभागी झाले होते. अग्निशमन दलाचे ३ बंब, २ फायर फायटर मोटार बाईक, २ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर यांचा वापर या मॉकड्रिल मध्ये करण्यात आला. तर अग्निशमन, सुरक्षा, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यात सहभागी झाले होते.

कार्यालयात अचानक आग लागली असता आगीवर नियंत्रण मिळवून त्या आगीपासून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिकांच्या जीवीताचे संरक्षण करता यावे, याबाबतच्या पूर्वतयारीसाठी संकटकालीन बचाव प्रशिक्षण (फायर मॉकड्रिल) महत्वपूर्ण ठरणार आहे.





