उत्तर प्रदेशमधील कुप्रसिद्ध गुन्हेगार, राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना पोलीस बंदोबस्तातच तीन लोकांनी कॅमेऱ्यासमोरच ठार केले. यानंतर तीन दिवसांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंबंधी आपली भूमिका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “एके काळी इतरांवर दहशत गाजवणारे माफिया आज स्वतः दहशतीखाली आहेत.” योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत लखनऊ आणि हरदोई जिल्ह्यात एक हजार एकरवर टेक्स्टाइल पार्क उभारण्यासंबंधी सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशची कायदा व सुव्यवस्था सुधारत असल्यामुळे आता गुंतवणुकीसाठी कारखानदारांना आपले राज्य जवळचे वाटत आहे. या करारावर स्वाक्षरी करीत असताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयलदेखील उपस्थित होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, २०१७ आधी उत्तर प्रदेश दोन गोष्टीसाठी ओळखले जात होते. एक म्हणजे सर्वात वाईट कायदा आणि सुव्यवस्थेच्या राज्यासाठी आणि दुसरे म्हणजे दंगलीसाठी. काही जिल्ह्यांचे नाव ऐकले तरी लोकांना भीती वाटायची. आता कुणालाही कोणत्याही जिल्ह्याला घाबरण्याची गरज नाही. जे लोक एके काळी उत्तर प्रदेशच्या प्रतिमेसाठी धोका निर्माण करीत होते, आज त्यांनाच धोका निर्माण झाला आहे.




