लोणावळा : कोणत्याही प्रकारचे धागेदोरे हाती नसताना एका अनोळखी व्यक्तीच्या खुनातील आरोपींना केवळ 24 तासाच्या आत जेरबंद करून हा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बजावली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीमधील आपटी धामनदरा याठिकाणी सदर खुनाचा गुन्हा घडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार आपटी धामनदरा मधील धनगरवस्ती येथील स्मशानभुमीच्या जवळील एका ओढयाचे लगत एका अनोळखी व्यक्तीच्या डोक्यामध्ये तसेच त्याच्या उजव्या पायावर जखम त्याचा खून करण्यात आला होता. शिवाय पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने त्याच्या अंगावरील कपडे, बुट काढून, ते लपवून ठेवून त्याचा मृतदेह नग्न अवस्थेमध्ये टाकून देण्यात आला होता. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही माहिती दुधीवरे गावचे सरपंच पांडुरंग विठ्ठल घारे यांना मिळताच त्यांना ही माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना कळवली.
घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पो. नि. किशोर धुमाळ ब सहा. पोलीस अधीक्षक शआयपीएस सत्यसाई कार्तीक यांनी घटनास्थळी दिली. त्यानंतर पोलिसांच्या तपासला वेग आला. खून झालेल्या व्यक्तीचे पुर्ण नांव, पत्ता माहिती नसताना, त्याचेकडे कोणताही मोबाईल नसताना, हा गुन्हा कोणत्या कारणास्तव घडला, कोणत्या हत्याराने, कोणी केला असे अनेक प्रश्न पुढं असताना केवळ गोपनिय बातमीदारामार्फत बुध्दी कौशल्याचा वापर करुन तपास करण्याचे व गुन्हा उघडकीस आणण्याचे आवाहन पोलीसांसमोर होते. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने वेगवेगळी पोलीस तपासी पथक तयार करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथक सुध्दा मदतीस दाखल झाले. मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता त्याचे फक्त रमेश एवढंच नावं समोर आले.
खून झालेला व्यक्ती काय काम करीत होता, त्याचा कोणाशी काय संबंध होता, याबाबत गोपनियरित्या माहिती जमा करून त्याची साखळी जुळवून पोलिसांनी केलेल्या तपासात काही धागेदोरे मिळाले. त्या आधारे केलेल्यातपासामध्ये संशयीत व्यक्तींना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास मारुती कोळी (वय २३ वर्षे) व गणपत किसन कोळी (वय ३० वर्षे, दोन्ही रा. धामनदरा, कातकरी वस्ती, पवनानगर, ता. मावळ) यांना जेरबंद केलं.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएस सत्यसाई कार्तीक, पो. नि. किशोर धुमाळ, स.पो.नि. निलेश माने, पो. उप.नि. भारत भोसले, सहा. फौजदार युवराज बनसोडे, अजय दरेकर, पो. हवा. नितीन कदम, संतोष शेळके, सिताराम बोकड, अनिल सपकाळ, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस अंमलदार केतन तळपे, राहुल खैरे, सचिन शेलार, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे स.पो. नि. नेताजी गंधारे, सहा. फौजदार प्रकाश वाघमारे, पो. हवा. हेमंत विरोळे, पोलीस मित्र भिमा वाळूज, श्रीकांत घरदाळे यांनी केली आहे. याप्रकरणी भा.दं.वि. का. क. ३०२, २०१ प्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि. निलेश माने हे करीत आहेत.



