मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमधील संपूर्ण वातावरणच बदललं. शरद पवार यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना, खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले.
अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांच्यासह सर्व प्रमुख नेते भावुक झालेले दिसले. फक्त तेच नव्हे, अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्याच्या दिसून आल्या. यावेळी अजित पवार सभागृहात सर्वांना शांत करताना दिसले.
एकएक करून अनेक नेत्यांनी आपल्या भावना आणि मत मांडलं. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी अजित पवारांना विनंती करण्याचा आग्रह केला. अजितदादा तुम्ही बोला, अजितदादा तुम्ही विनंती करा, अजितदादा साहेब तुमचं ऐकतील, तुम्ही विनंती करा, असं म्हणत अजित पवार यांना विनंती करण्याचा आग्रह केला. यानंतर अजित पवारांनी आपण का विनंती करत नाहीये ते स्पष्ट केलं. ‘अरे वेड्यांनो तुम्ही विनंती करू शकता. मी आणि सुप्रिया बोलायला लागलो, तर आम्हाला म्हणतील बस खाली. आम्हाला बोलू देणार आहेत का ते’, असं अजित पवार म्हणाले.



