शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे हे पद दिलं जाऊ शकतं अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर काहींच्या मते सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होतील आणि अजित पवारांकडे राज्यातला पक्षाचा कारभार सोपवला जाऊ शकतो. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारले असता, भुजबळ म्हणाले, साधारणपणे पक्षाचा राज्यातल्या कारभार अजितदादा बघतात आणि दिल्लीतलं पक्षाचं काम संसदेचं काम सुप्रियाताई योग्य पद्धतीने सांभाळतात. सुप्रिया ताईंना प्रश्नांची जाण आहे. त्यांना अनेकदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (२ मे) अचानक पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. पवारांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. शरद पवारांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत, तसेच तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काहींना वाटतंय त्यांनी दबावातून हा निर्णय घेतला आहे तर काहीजण या निर्णयाला मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, शरद पवार अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



