पुणे : वेधशाळेने बुधवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी शहरातील बहुतेक सर्वच भागांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. कोरेगाव पार्कमध्ये ४४.४ अंश सेल्सिअस तर वडगाव शेरीमध्ये ४३.१ अंश सेल्सिअस आणि पाषाण, शिवाजीनगरमध्ये अनुक्रमे ४१.१ आणि ४१.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच पिंपरी चिंचवड परिसरातही तापमानाचा ४० पेक्षा जास्त नोंदवला गेला.
गुरुवारपासून शहरातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही वाढ या मोसमातील सर्वाधिक असेल, असेही वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचा परिणाम गुरुवारी तत्काळ दिसून आला आहे. कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि पाषाणमध्ये या मोसमातील सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे, शिरुर, राजगुरु नगर, खेड, चिंचवड, डुडुळगाव, हडपसर, बल्लाळवाडी, लवळे, मगरपट्टा, तळेगाव, दौंड, पुरंदर, आंबेगाव, गिरीवन, एनडीए, बारामती या सर्व भागांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला आहे.




