मुंबई ; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासाठी सर्वोच्च न्यायालयात आज निर्णायक दिवस होता. ८ महिने दोन्ही गटांचे युक्तीवाद आणि प्रतिवाद ऐकून घेतल्यानंतर मार्च महिन्यात सुनावणी पूर्ण झाली. शेवटच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर, या प्रकरणी ज्या घटनापीठाकडे सुनावणी सुरू होती त्या घटनापीठातील एक न्यायाधीश १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे हा निकाल त्याआधीच लागणार असल्याची शक्यता होती. अखेर, आज (११ मे) हा निकाल लागला असून आज सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरच ताशेरे ओढले. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.
सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
“२१ जून रोजी राज्यपालांना (भगगसिंह कोश्यारी) दिलेल्या पत्रामध्ये आमदारांची नाराजी दिसली असली, तरी त्यांना सरकारचा पाठिंबा काढायचा आहे असं कुठेही दिसून आलं नाही. परंतु राज्यपालांनी सांगितलं की, आमदारांनी सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा दर्शवली आहे. दरम्यान, यावेळी विरोधी पक्षांकडून विद्यमान सरकारविरोधात अविश्वास ठराव सादर करण्याची इच्छाही व्यक्त केली गेली नव्हती. राज्यपालांसमोर आलेली कागदपत्रे बहुमत चाचणीचे आदेश देण्यासाठी पुरेसे नव्हते”, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.



