मुंबई – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा करत शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी निवडणुका घेण्याचे आवाहन केलं आहे. तसेच, आमदारांच्या अपात्रेबद्दलची आमची याचिका होती, त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची कृती, व्हीपची नेमणूक, बहुमत चाचणी या सगळ्या गोष्टी बेकायदेशीर ठरवल्या आहेत. त्यामुळे, व्हीपच्या विरोधात मतदान करणारे सर्वच ३९ आमदार बेकायदेशीर आहेत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. शिवसेना नेते अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष अधोरेखित केले. तसेच, आमदारांच्या अपात्रेनंतर अध्यक्षांची निवडही बेकायदेशीर होईल, त्यासंदर्भात आम्ही न्यायालयात जाऊ, असेही परब यांनी म्हटले.
सुप्रीम कोर्टाने लक्तरे टांगल्यानंतर नैतिकतेला धरून शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा. तुम्हाला जीवदान मिळाले असेल तर ते तात्पुरते आहे. महाराष्ट्राची अवहेलना थांबवली पाहिजे. आत्ताच्या सरकारने नैतिकतेला धरून राजीनामा दिला पाहिजे. आपण सगळे निवडणुकीला सामोरे जाऊया. कोर्टाचा निकाल आला पण लोकशाहीत सर्वात शेवटचे न्यायालय जनतेचे असते. जनतेचा फैसला स्वीकारूया. जनता जे काही ठरवेल ते मान्य करूया असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केले आहे.
यावेळी, विधानसभा अध्यक्षांनाही लक्ष्य केलं. सध्याचे विधानसभा अध्यक्ष अगोदर आमच्या पक्षात होते, पुन्हा राष्ट्रवादीत गेले आणि भाजपात आहेत. त्यामुळे, त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून पक्ष बदलाचा अनुभव आहे. आता, त्यांनी कायद्याच्या चौकटीतील निर्णय घ्यावा, लवकरात लवकर आमदार अपात्रतेच्या निर्णयावर सुनावणी घ्यावी, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.



