पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला सेफ सिटी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी पोलिसांचे बळकटीकरण करण्यात येईल, असे मत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय केले. आता पोलिसांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. मनुष्यबळ आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आयुक्तालयासाठी नवीन इमारत केली जाणार असून अधिक अधिकारी देखील दिले जाणार आहेत. पिंपरी-चिंचवडला सेफ सिटी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी अगोदर पोलिसांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. या बळकटीकरणाला सुरुवात याच वर्षी होणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.




