पिंपरी: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आनंदवारी आणि विशेष पालखी सोहळ्याला आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड शहराचा पालखी मार्ग व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था, शांतता तसेच पावित्र्य अबाधित राहावे, यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणची सर्व दारूदुकाने, मांस आणि मांसाहारी पदार्थांची विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत दिपक खैरनार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात दरवर्षी आषाढी एकादशीला देश-विदेशातून लाखो भाविक-वारकरी पंढरपूरला जातात. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातून संत तुकाराम महाराज पालखी तर पुणे शहरातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयासह अनेक संतांच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होते. त्यामुळे या ठिकाणी अवघ्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील जनसमुदाय हा पालखींचे दर्शन घेण्यासाठी पुणे शहरात आलेला असतो. पंढरपूरच्या वारीची परंपरा पाहता महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीतील ही एक महत्वपुर्ण आनंदवारी आहे.
या पालख्यांच्या माध्यमातून होणारी समाजमनाची जडण-घडण वारीच्या वाटेवर पाहायला मिळते, हे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी पालखी मार्गावरील व पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणची सर्व दारूदुकाने, मांस आणि मांसाहारी पदार्थांची विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावेत,असे दिपक खैरनार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.




