देहूगाव (वार्ताहर ) श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्यातील पालखी रथ ओढण्यासाठी ( सारथ्यासाठी ) येलवाड़ी येथील सुरेश दिगंबर मोरे यांच्या सोन्या व खासदार आणि पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या सोन्या- राज्या या बैलजोडीना प्रथमच मान मिळाला आहे .तर नगारखाना चौघडा गाडीसाठी चिंबळी येथील सत्यवान ज्ञानेश्वर जैद यांच्या बैलजोडीची निवड करण्यात आल्याची घोषणा श्री संत तुकाराम महाराज संस्थानने केली आहे.
संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे,पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे,भानुदास महाराज मोरे,अजित महाराज मोरे,विश्वस्त संतोष महाराज मोरे,माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.पालखी सोहळ्यातील रथाला जुंपपण्यासाठी १८ बैलजोडी मालकांनी तर चौघडा गाडीसाठी ४ बैलजोडी मालकांनी संस्थानकडे अर्ज केले होते.अर्जाची परीक्षण करून पालखी रथासाठी २ बैलजोडयांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षणामध्ये बैलांचे आरोग्य ,वय, शिंगे ,वशींड, रंग, शेपटी ,खूर ,उंची, शुभ्रता,त्यांची काम करण्याची क्षमता आदी निकषाची पाहणी करून सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती संस्थानने दिले.
पालखी सोहळ्याच्या रथावरील सारथ्य करणाऱ्याला संस्थानकडून ओळखपत्र दिले जाईल. त्यालाच रथात बसण्याची परवानगी असेल. तो परिचित असावा. त्याचे वागणे सोज्वळ,पेहराव वारकरी संप्रदाय प्रमाणे ,आहार शुद्ध शाकाहारी असावा.पालखी तळावरून पालखी निघण्यापूर्वी किमान पंधरा मिनिटे अगोदर तयारीत असावे.अवर्तन दिसून आल्यास वारीतून खंडित करण्याची तर मान मिळालेल्या बैलजोडीची मिरवणूक काढू नये अशा सूचनाही संस्थानने यावेळी दिले.
सुरेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, पालखी रथाला बैलजोडीचा मान मिळण्यासाठी संस्थानकडे गेली अनेक वर्षांपासून अर्ज करीत आहे. यंदा प्रथमच सेवा करण्याचा मान मिळाला आहे. बैलांचे वय ७ वर्षे असून सोन्या व खासदार अशी नावे आहे .त्यांची उंची पावणे सहा फूट तर रंग पांढरे शुभ्र आणि टोकदार शिंगे असल्याची तर त्यांची वडील दिगंबर श्रीपती मोरे हे संस्थानचे माजी अध्यक्ष असल्याची माहिती दिली आहे.
झिंजुर्डे यांच्याशी संपर्क साधला असता संस्थानकडे 4 वर्षांपासून अर्ज करीत आहे. प्रथमच मान मिळाला आहे . सोन्या व राज्या अशी बैलांची नावे असून त्यांचे वय ७ वर्षे,५.५ फूट उंचीचे आहेत.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील फरताळे दिंडीची सेवा करत असतात.
चौघडा गाडीसाठी निवड करण्यात आलेल्या चिंबळी येथील सत्यवान जैद यांनी प्रथमच अर्ज केला असून प्रथमच मान मिळाल्याचे देहू आणि आळंदी पालखी सेवा करीत असल्याचे तसेच चौघडा गाडीसाठी सर्जा व राज्या अशी नावे निवड करण्यात आलेल्या बैलांची नावे असल्याची माहिती दिली आहे.




