छत्रपती संभाजीनगर : लोकशाहीच्या संस्थांवर हल्ला करणाऱ्या राज्यकर्त्यांना या पूर्वीही सर्वसामांन्यांनी नाकारले आहे. तोच विचार लोकसभेच्या निवडणुकीतही ते करतील पण त्यासाठी विरोधी पक्षाने विश्वासार्ह पर्याय उभा करून देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
देशातील विविध राज्यात भाजपचे सरकार नाही. दक्षिणेतील केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये तर नाहीच, पण खूप ताकद लावूनही कर्नाटकात भाजपला यश मिळाले नाही. गुजरात आणि उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य आहे. पण गोव्यामध्ये ते नव्हते. मध्यप्रदेशात ते बदलण्याचे प्रयत्न झाले. झारखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब यासह अनेक राज्यात भाजपचा विचार जनतेने केला नाही. राज्य सरकारने निवडून देताना केला जाणारा हा विचार लोकसभा निवडणुकीतही होऊ शकतो. मात्र, त्यासाठी आम्ही लोकांनी विश्वासार्ह पर्याय द्यायला हवा असे पवार म्हणाले. लोकांनी संसदीय लोकशाहीच्या संस्थात्मक रचनेवर हल्ला करणाऱ्यांचा नेहमी वेगळा विचार केला आहे.



