मुंबई: देशभरात ऑनलाईन धर्मांतरचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. गाझियाबाद ऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणाचे कनेक्शन मुंब्र्यात असून तेथुन सुमारे 400 जणांचं धर्मांतर झाल्याचा धक्कादायक खुलासा झाला होता. याप्रकरणी रविवारी ठाणे पोलिसांनी एकाला अलिबाग येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता मोठी अपडेट समोर आली आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मुंब्रा परिसरात एकही धर्मांतराचे प्रकरण आढळले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अटक केलेल्या आरोपीची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत धर्मांतराचे एकही प्रकरण पोलिसांना सापडले नाही.
शाहनवाज खान असे त्याचे नाव असून मागील काही दिवसांपासून गाजियाबाद पोलीस त्याचा शोध घेत होते. शाहनवाज हा मुंब्रा येथे वास्तव्यास होता. त्याने अनेकांचे धर्मांतर घडविल्याचा दावा गाजियाबाद पोलिसांनी केला होता.(Latest Marathi News)
ठाणे पोलिस नेमकं काय म्हणाले?
आम्ही आरोपी शाहनवाज खानची चौकशी केली असून मुंब्र्यामध्ये धर्मांतराची कोणतीही घटना घडली नसल्याचे यातून स्पष्ट झाले असल्याचे ठाणे डीसीपी गणेश गावडे यांनी सांगितले. गाझियाबाद पोलिसांनी खानला ठाणे कोर्टात हजर केले होते. ठाणे कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजेच, तीन दिवसांच्या आत गाझियाबाद येथील न्यायालयात त्याला हजर करणे बंधनकारक आहे. तसंच, त्याला सुरक्षितपणे घेऊन जाणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
या प्रकरणातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “गाझियाबाद पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या मौलवी अब्दुल रहमानच्या खात्यातून २० हजार रुपये हस्तांतरित केल्याचे त्यांना आढळले आहे. एका तरुणाचे गेमिंग प्लॅटफॉर्मवर कथितरित्या धर्मांतर झाल्याच्या प्रकरणात रेहमानला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आता पुढील तपास गाझियाबाद पोलीस करणार आहेत.



