मुंबई : कर्नाटकाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होणार आहे, त्यासाठी धनगर समाज बांधवांनी केलेल्या प्रयत्नाला आज यश आले. बारामती येथील अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (ता. २६ जून) बारामतीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त येत असल्याचे निश्चित केले. याबाबतची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बारामतीत निमंत्रीत करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. संबंधित नेत्यांशी पवारांनी पत्रव्यवहारही केला होता. त्यामुळे सिद्धरामय्या यांनी बारामतीला येण्याचे मान्य केले, असेही देवकाते यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा बारामती दौरा महत्वपूर्ण ठरेल, अशी चर्चा रंगू लागली आहे. या वेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



