लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर लोणावळा शहरातील कुणेगाव पुलावर मंगळवारी (ता.13) झालेल्या टॅंकर अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ झाली असून ही संख्या पाच झाली आहे. इथेनॉल हे केमिकल घेऊन जाणाऱ्या टॅंकरला अपघात होऊन लागलेल्या आगीत मंगळवारी एकूण 4 जण मृत झाले होते तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. या जखमींमधील एकाचा बुधवारी (ता.14) मृत्यू झाला.

मंगळवारी सकाळी 11.30 वाजता सदरचा अपघात झाला होता. मात्र त्यानंतर उशीरापर्यंत स्थानिक मृत आणि जखमींची नावं वगळता या अपघातग्रस्त टॅंकर विषयी तसेच त्यात प्रवास करणाऱ्या मृत आणि जखमी व्यक्तींविषयी पोलिसांना रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त झाली नव्हती. मात्र पोलिसांनी एक्सप्रेस हायवेच्या टोल नाक्याचे सीसीटीव्ही तपासून या टॅंकरचा क्रमांक मिळवण्यात आला. या अपघातग्रस्त टॅंकरचा क्रमांक एम.एच. 42 बी.एफ. 9979 असा असून नितीन सुखदेव सत्रे (वय 32, रा. मोगराळे, ता. मान, जि. सातारा) हा या टॅंकरचा चालक असल्याचे समोर आले आहे. टॅंकर चालक हा गंभीर जखमी असून त्याच्याशिवाय टॅंकर मधील दुसरा प्रवासी चंद्रकांत आप्पा गुरव (वय 49, रा. धनकवडी, पुणे) आणि इनोव्हा चालक गणेश एकनाथ कोळसकर (वय 39, रा. अंधेरी) हे दोघेजण देखील गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी इनोव्हा चालक गणेश कोळसकर याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय मंगळवारी टॅंकरमध्ये होरपळून मृत झालेल्या त्या अनोळखी व्यक्तीची ओळख मिळाली असून जनार्दन बापूराव जाधव (वय 60, रा. घाटकोपर) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
टॅंकरला लागलेल्या भीषण आगीमध्ये टॅंकरसह सदर टॅंकर मार्गावरून बाजूला करण्यासाठी बोलवण्यात आलेला एक क्रेन, तसेच पुलाखालील रस्त्यावरून जाणारी एक दुचाकी शिवाय पुलाखाली उभ्या असलेले दोन टेम्पो डंपर, एक मोपेड दुचाकी आणि एक इनोव्हा आशा तब्बल सात गाड्या जळून खाक झाल्या असून पुलाखालील एक चहाची टपरी देखील जळून गेली आहे. यातील पुलाखालून प्रवास जात असलेल्या दुचाकीवरील तीन जण आणि पुलाखालील उभ्या असलेल्या इनोव्हाचा चालक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
राजमाची गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
एक्सप्रेस हायवेवरील जळत्या टॅंकरमधून अंगावर पडलेल्या पेटत्या इथेनॉलमुळे लोणावळा शहराजवळ अतिदुर्गम ठिकाणी असलेल्या राजमाची या आदिवासी खेड्यातील एकाच कुटुंबातील तीनजण होरपळून मृत झाले.
यात सविता कैलास वरे (वय 34) आणि कुशल कैलास वरे (वय 8) या मायलेकरांसह सविता वरे यांचा भाचा रितेश महादू कोशिरे (वय 18 वर्षे) यांचा समावेश आहे. हे तिघेही जण त्यांच्या जवळील दुचाकीवरून लोणावळ्यातून राजमाचीकडे निघाले असता मृत्यूने अचानक त्यांच्यावर घाला घातला. कुशल आणि रितेश यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर सविता या गंभीररित्या भाजलेल्या असल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा दुःखद मृत्यू झाला. अपघाताची ही बातमी समजताच संपूर्ण राजमाची गावावर शोककळा पसरली.




