पिंपरी चिंचवड शहरात मान्सून दाखल होण्यापूर्वी १५ मेपासून शहरात रस्ते खोदाई करू नये, असे आदेश असतानाही पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी गंधर्वनगरी येथे महामार्गालगतचा रस्ता खोदून ठेवला आहे. ज्या ठिकाणी रस्ता खोदला तेथेच बसचा थांबा असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी खोदाई कोणी केली, हे मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याचे समोर आले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील गंधर्वनगरी, केंद्रीय विहार, केंद्रीय विहारलगतचा परिसर, स्पाइन रस्ता या ठिकाणी राहणारे व बसने प्रवास करणाऱ्यांना जवळच असलेल्या केंद्रीय विहारसमोरील बसथांब्यावर यावे लागते. पावसाळ्यात रस्ते खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघातांचा धोका असतो. १५ मेपासून शहरात कोणत्याही प्रकारे रस्ते खोदाई करू नये असे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. महापालिकेचे आदेश डावलून रस्ते खोदाई होत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हा महामार्ग असल्याने याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाते. रस्त्यालगत केलेल्या खोदाईबाबत पालिकेकडून चौकशी करण्यात येईल. सध्या तरी येथे पालिकेकडून कोणतेही काम सुरु नाही.
- प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता, पिंपरी चिंचवड
पुणे-नाशिक महामार्गावरील रस्त्यालगत असलेली ती जागा बसथांब्याची असल्याने याबाबत बीआरटी विभागाने काही कामासाठी परवानगी दिली असेल, ई प्रभाग कार्यालयातून याबाबत कोणतेही कामकाज सध्यातरी सुरु नाही.
– चंद्रशेखर कुर्ले, कनिष्ठ अभियंता




