बारामती : प्रकाश आंबेडकर वरिष्ठ आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरूण काय करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र ते तिथे का गेले हे प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे सांगू शकतील. शिवप्रेमींना हे योग्य वाटत नाही. त्यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमी नाराज आहेत, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरील भेट दिली यावरती प्रतिक्रिया देताना बारामती येथे विकास कामांचा आढावा तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अजित पवार रविवारी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आले. याचे सर्वसामान्य बारामतीकरांनी तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा स्वागतच केले. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव वैद्यकीय महाविद्यालयाला देत असताना त्यामध्ये कोठेतरी बारामतीचा उल्लेख असावा अशी भावना अनेकांनी मला बोलून दाखवली आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा मला मनापासून आनंदच आहे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.



