पिंपरी : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती के आहे. मात्र वंचित हा पक्ष महाविकास आघाडीत शामिल होणार की नाही, यावरून आजही साशंकता आहे. नुकत्याच झालेल्या चिंचवड व कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतून वंचित आघाडी सोबत राहिली नाही. त्यात चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत आंबेडकर यांनी घेतलेल्या दुहेरी भूमिकेमुळे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पक्षाला राम राम करत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर आगामी महापालिका विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अखेर पिंपरी चिंचवड शहरासाठी वंचित आघाडीने आपला शहराध्यक्ष निवडला नाही. त्यामुळे वंचित आघाडीचे कार्यकर्ते यांना शहराध्यक्ष विना वंचित राहण्याची वेळ आली आहे. एकीकडे डॉ. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी एकमत होऊन साथ देताना दिसत आहेत. तर दुसरीकडे औरंगजेब यांच्या कबरीला भेट देऊन दुहेरी भूमिका घेताना दिसत आहेत. हाच प्रकार चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत त्यांनी ठाकरे यांना साथ दिल्यानंतर आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना साथ दिली होती. त्याचा फटका पक्षाला पिंपरी चिंचवड शहरात बसला. पोटनिवडणुकीत शहराध्यक्षा यांच्यासह अनेक कार्यकर्ते नाराज होत पक्ष सोडला.
चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी महाविकास आघाडी ठाकरे गटाला संधी देईल, अशी चर्चा होती. मात्र चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाली. वंचित आणि ठाकरे गटाची युती झाल्याने वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी उमेदवार दिला नाही. तसेच निवडणुकीत उमेदवार उभा करण्यावरून ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. ठाकरे यांच्या सांगण्यावरून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष मदत करणार असल्याचं बोललं जात होते. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीने दोन्ही ठिकाणी उमेदवार दिलेले नव्हते. पण वंचित हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ न देता वेगळी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज झाले त्याचा फटका पक्षाला बसला. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशा वेळी पक्ष संघटनेत मार्ग आली आहे पक्षाला शहरात शहराध्यक्ष नसल्याने कार्यकर्त्यांना कोणतेही दिशा व मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे अजून किती दिवस वंचित आघाडी पक्ष शहराध्यक्ष विना वंचित राहणार आणि नवीन शहराध्यक्ष कोण मिळणार याकडे कार्यकर्ते याचे लक्ष लागून राहिले आहे.




