- राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या निवासी शिबिराच्या समारोपाला शरद पवार यांची उपस्थिती
लोणावळा : परिवर्तनासाठी सत्तेची गरज आहे. मात्र राजकारण हे केवळ सत्तेसाठी करायचं नसतं आणि केवळ राजकारणासाठी सर्व काही करायचं नसतं. राजकारण करताना व्यापक दृष्टिकोन ठेवायला हवा. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचे सल्ले गरजेचे आहेत. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस विविध क्षेत्रात वेगवेगळे सेल निर्माण करीत आहे. आणि याचे अनेक फायदे होताना दिसत आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोणावळ्यात केले. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या निवासी शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या माध्यमातून लोणावळा शहरात दोन दिवसीय राज्यस्तरीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात संपूर्ण राज्यातून सहभागी झालेल्या 400 निमंत्रित डॉक्टरांना या दोन दिवसात वेगवेगळ्या विषयावर तज्ज्ञांची व्याख्याने आणि चर्चा सत्रातून मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार निलेश लंके, सुनील शेळके, पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, तुम्ही डॉक्टर लोकांना त्यांच्या शारीरिक व मानसिक अडचणीच्या काळात मदत करता. त्यांचा तुमच्यावर विश्वास असतो, एक वेगळं नातं तयार होतं. ऋणानुबंध जुळतो. तो तुम्ही जतन केला पाहिजे. ही मोठी संधी तुम्हाला तुमच्या कामातून मिळाली आहे. गेले ३५ दिवस मणिपूरमध्ये जाळपोळ सुरू आहे. सरकार काही करत नाहीय. आम्ही भारतीय नागरिक आहोत की नाही असा प्रश्न तिथल्या स्थानिक लोकांना पडतोय. ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे.
जात, धर्म यांच्या नावाखाली समाजामधील विविध गटांमध्ये तेढ व द्वेष निर्माण केला जातोय. गेल्या तीन महिन्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जातीय, धार्मिक दंगली झाल्या आहेत. समाजात जाणीवपूर्वक दुषित वातावरण निर्माण करणारे काही घटक आहेत. हे सामाजिक ऐक्याला तडा जाईल असे काम करत आहेत. देशातील सुव्यवस्थेच्या दृष्टीने, लोकशाहीच्या दृष्टीने ही परिस्थिती चिंताजनक आहे. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. त्यासाठी तुम्हालाही कार्यरत व्हावे लागेल.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, देशातील सत्तर टक्के लोकांनी भाजपचं सरकार नाकारलं आहे. या देशाचे लोक चांगले, सुशिक्षित आहेत. फक्त त्यांच्या समोर सद्यपरिस्थिती योग्य पद्धतीने मांडली पाहिजे. खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे. तुम्ही सर्व डॉक्टर बौद्धिक आणि सामाजिक कार्य करणारे सुजाण नागरिक आहात. तुम्ही यासाठी सामाजिक जनजागृती करण्याचे काम केले पाहिजे. आता देशाचा कारभार कोणी चालवावा याबाबत निर्णय घेताना प्रादेशिक पक्षच हे ठरवतील, यात कोणती शंका नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली. त्या आधी आणि नंतर काय घडलं. ते आपल्या देशातील शहाण्या जनतेने घडवलं. आत्ताही आपल्याला या जनतेपर्यंत हे सगळं पोहचवले की बदल निश्चित आहे. त्यामुळं डॉक्टरांनी इंजेक्शन देताना कानात सांगा, त्यांनी कोणत्या बाजूनं मतदान करायला हवं. हे कार्य केलं तर सत्तांतर नक्की आहे. विविध राजकीयांनी संघटित राहायला हवं. कारण सध्या धर्म, जातीच्या नावाने समाजात संघर्ष निर्माण केला जातंय. या प्रवृत्तीमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती आहे. या गोष्टी देशाच्या बाबतीत गंभीर आहेत. गेल्या काही दिवसांत कितीतरी जातीय दंगली होतायेत. हे सांगतानाच पवार यांनी या सर्व दंगलीची तारखेनुसार मांडणी केली.
मी डॉक्टर नसलो तरी मुन्नाभाई एमएमबीएस आहे – आमदार निलेश लंके
मी डॉक्टर नसलो तरी मुन्नाभाई एमएमबीएस आहे. हो मला लोकं तसंच म्हणतात. कारण कोरोना काळात मी रुग्णांना हाताळत होतो. कोरोना सेंटरवर आलेल्या व्यक्तीला पहिल्यांदा मीच तपासायचो. मी डॉक्टर नाही, पण मी थोडा अभ्यास केला. प्रत्येक रुग्णाला आधार दिला, त्याचं दुःख दूर केलं, तिथं मनोरंजनात्मक उपचार केले. कारण मी कोरोना सेंटर नव्हतं तर शरद पवार आरोग्य मंदिर उभारलं होतं अस प्रतिपादन करीत आमदार निलेश लंके यांनी, जो स्वतःसाठी जगतो त्याची माती होते, जो समाजासाठी जगतो त्याचं कल्याण होतं असा सल्ला उपस्थितांना दिला.



