मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती पक्षाच्या कार्याध्यक्षपदी केली आहे. सुप्रिया सुळेंच्या या नियुक्तीमुळे अजित पवार नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यानंतर आता स्वत: अजित पवारांनी पक्षाची जबाबदारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली. अजित पवारांच्या या विधानानंतर राजकीय नेत्यांकडून विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे. अजित पवार काही दिवसांत उठाव करतील, असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीच्या पांडूरंगाची महापूजा करतील. यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांच्या राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल, असं विधान मिटकरी यांनी केलं. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मिटकरींनी ही प्रतिक्रिया दिली. मिटकरींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.
आगामी निवडणुकीनंतर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन पुढच्या आषाढी एकादशीची महापूजा करतील. अजित पवारांना महापूजेचा मान मिळो. कारण आळंदीच्या पालखीतील वारकऱ्यांवर झालेला हल्ला, हे वारकरी कधीही विसरू शकणार नाहीत. यावर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी एकनाथ शिंदे हे पंढरीच्या पांडूरंगाची महापूजा करतील. ही महापूजा एकनाथ शिंदेंच्या राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल. पुढील महापूजा अजित पवारांच्या हस्ते होणार, ती महापूजा अजित पवारांच्या हस्ते होवो, हेच साकडं तुकोबारायांच्या चरणी अमोल मिटकरी यांनी घातलं आहे.



