मुंबई : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला तीन वर्षे होऊन गेली आहेत. मात्र अजूनही त्याच्या आत्महत्येच्या तपासातून ठोस कोणतीही माहिती समोर आलेली नाही. १४ जून २०२० रोजी सुशांतनं त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये त्यानं आत्महत्या केली होती.
सुशांतच्या निधनानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर आल्या होत्या. त्यातून बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींना सीबीआयनं चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं. यासगळ्यात बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटही समोर आले होते. त्यात कित्येक प्रसिद्ध कलाकारांचा समावेश होता. यासगळ्यात बॉलीवूडची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली होती. त्यात बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं चाहत्यांना शांत राहण्याचे आणि कलाकारांना समजून घेण्याचे आवाहन केले होते.
फडणवीस म्हणाले की, सुशांत आणि दिशाच्या मृत्यूप्रकरणावर सीबीआयकडून पुरावे गोळा करण्याचे काम वेगानं सुरु आहे. सगळे पुरावे जमा झाले की मग आम्ही हे प्रकरण उजेडात आणणार आहोत. जेव्हा लोकांनी देखील आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि तुम्ही कारवाई करा असे म्हटले होते तेव्हा आम्ही ते पुरावे गोळा करुन त्याची तपासणी सुरु केली आहे. जर त्या पुराव्यात तथ्य असेल तर त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
आम्ही काही रेकॉर्डिंग देखील केले आहे. त्यासाठी काही पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे आता कोणत्या गोष्टीवर तातडीनं बोलणे चूकीचे ठरेल. गेल्या तीन वर्षांपासून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलीस आणि सीबीआय यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा अजूनही कसा आला नाही असा प्रश्न सुशांतच्या चाहत्यांनी उपस्थित केला आहे.



