खालापूर – कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाकटी पंढरी ताकई येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकदशी निमीत्ताने भक्तांची मांदीयाळी होती. पहाटे महापूजेचा हातोंड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पंकज पाठारे आणि त्यांच्या पत्नी विद्यमान सदस्या वृषाली पाठारे यांच्या हस्ते संपन्न झाली, त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. पावसाचा जोर कायम असतानाही दिवसभर पनवेल, अलिबाग, पेण, पालीसह जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी आले होते. तर विठूरायाच्या गजरात अवघी धाकटी पंढरी दुमदुमून गेली होती.
संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खालापूर तालुक्यातील ताकई येथील बोंबल्या विठोबाच्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने मोठा सोहळा पार पडतो. या सोहळ्यात महापूजेला अनन्य साधारण महत्व असतं, त्यामुळे या महापूजेचा मान आपल्याला मिळावा यासाठी अनेकजण प्रयत्न करीत असतात. यावर्षी हा महापूजेचा मान हातोंड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पंकज पाठारे आणि त्यांच्या पत्नी विद्यमान सदस्या वृषाली पाठारे यांना मिळाला. आणि त्यांनी मोठ्या भक्तीभावाने सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. यावेळी पाटील यांचे कुटुंब तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खोपोली शहरातील ज्येष्ठ नागरिक, बूज हास्य क्लब यांची पायी दिंडी आली होती. खालापूर तालुक्यातील छोट्या दिंड्या आल्या होत्या. दिवसभर भजन, किर्तनाचा कार्यक्रम सुरू होते. हार, पुजेचे आणि मिठाईच्या दुकानांमुळे यात्रेचे स्वरूप आल होतं. तर रौद्र शंभू ढोल ताशा व ध्वज पथक आणि लव्हेज ग्रामस्थ यांनी भाविकांसाठी मोफत चहापान ठेवल होतं. तसेच मंदीर परिसरात कोणतीही अनुचित घटना घडून नये, वाहतूक कोंडी होवू यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
गेल्या 18 वर्षापासून वारकरी सांप्रदायिक म्हणून काम करीत असताना धाकटी पंढरीत महापूजेचा मान मिळाल्याबद्दल देवस्थान कमिटीचे आभार व्यक्त करीत रायगडात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखाऊ दे अशी प्रार्थना पांडूरग चरणी केली आहे.
पंकज पाठारे – पूजेचे मानकरी
आषाढी पर्वणी एकादशी निमित्ताने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी देवस्थान कमिटीने उत्तम व्यवस्था केली आहे. तसेच रौद्र शंभू ढोल ताशा व ध्वज पथक आणि लव्हेज ग्रामस्थ यांनी भाविकांसाठी मोफत चहापान ठेवल्याबद्दल आभार.
सुधीर पाटील – अध्यक्ष – श्री विठोबा देवस्थान कमिटी



