लोणावळा : लोणावळा शहरात मागील 24 तासात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद झाली असून येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. आज वीकेंडच्या पहिल्याच शनिवारी भुशी डॅम भरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली व पर्यटकांनी एकच गर्दी केली. लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांची पंढरी म्हणून अनेकदा उल्लेख केलं जाणारे हे धरण ओसंडून वाहू लागल्याने शनिवार आणि रविवारी लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.
मागील काही दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने शुक्रवारी देखील जोर कायम ठेवल्याने येथील डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे आकाराने लहान असलेल्या भुशी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि भुशी धरण पाच दिवसात ओव्हरफ्लो झाले आहे. मागील वर्षी याच जुलै महिन्याच्या 6 तारखेलाच भुशी धरण ओव्हरफ्लो झालं होतं. त्यामानाने यंदा धरण लवकरच म्हणजे 30 जून रोजी ओव्हरफ्लो झाले आहे.
आज शनिवारी भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून फेसळत वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आंनद लुटण्यासाठी शेकडो पर्यटकांनी हजेरी लावली. मागील दोन्ही विकेंडला पर्यटकांनी भुशी धरणावर मोठी गर्दी केली होती. त्यावेळी भुशी डॅम न भरल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मात्र या विकेंडला भुशी डॅम ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
पोलिसबल वाढविण्याची आवश्यकता, अन्यथा आगामी विकेंड भगवान भरोसे
भुशी धरण भरल्याने लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार हे निश्चित असल्याने पोलिसांना मोठा ताण सहन करावा लागणार आहे हे निश्चित. त्यातच लोणावळा पोलिसांकडे मर्यादित पोलीस बळ असल्याने मागील दोन आठवड्यात वाहतूक व्यवस्थेचा उडालेला खेळखंडोबा बघता आगामी काळात तर त्याहूनही वाईट परिस्थितीचा सामना पर्यटक आणि स्थानिकांना करावा लागणार आहे. लोणावळा पोलिसांकडून धरणाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर रायवूड पार्क आणि नौसेना बाग याठिकाणी पोलीस पोस्ट लावण्यात आली आहे. मात्र त्याठिकाणी तैनात करण्यास पोलिसच उपलब्ध नसल्याने त्या पोस्टचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी स्वतः लक्ष घालून याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करणं आवश्यक आहे. अन्यथा आगामी विकेंडला येथील वाहतुकीची परिस्थिती ही केवळ भगवान भरोसे असेल यात तिळमात्र शंका नाही.




